- पूनम अपराज
मुंबई - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता एन्काऊंटर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली. मात्र, पोलिसांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर करून खात्मा केला. या घटनेसारखे सामूहिक बलात्कारात दोन आरोपींनी मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर करून सराईत दोन गुंडांना यमसदनी पाठविले होते.९ एप्रिल १९९१ साली मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्वेकडे घडलेली ही घटना आज हैदराबाद प्रकारणानंतर निवृत्त पोलीस अधिकारी अंबादास पोटे आणि मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निगुडकर यांना आठवली आहे. वाकोला पोलीस ठाण्यात मी गुन्हे विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होतो. ९ एप्रिल १९९१ साली रात्री वाकोला पोलीस ठाण्यात ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार देण्यास पीडित मुलीचे आई - वडील आले होते. त्यानंतर आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली. ७ दिवसांनी आरोपी बळी नांदिवडेकर आणि बाबा परमेश्वर हे सांताक्रूझ येथील धोबीघाट परिसरातील आग्रीपाडा झोपडपट्टी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा आम्ही तेथे गेलो असता आरोपींनी पोलीस शिपाई आणि अंमलदारावर चॉपरने छातीवर वार केले. पोलिसांच्या झटापटीत आम्ही आरोपींवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा खात्मा केला अशी माहिती निवृत्त पोलीस अधिकारी अंबादास पोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
त्यावेळी पोलीस उपायुक्त अरुप पटनाईक यांनी १९९१ च्या सामूहिक बलात्कारात आरोपी ७ दिवस झाले तरी मोकाट असल्याने पोलिसांना फैलावर घेतले होते. पोलीस अधिकारी असलेल्या अंबादास पोटे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तपास पथकात एन्काउंटर करताना पोलीस उपनिरीक्षक सुधीर निगुडकर हे देखील सामील होते. निगुडकर आता मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देखील १९९१ च्या एन्काउंटरबाबत जाणून घेतले.
निगुडकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, १९९१ साली ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्यावेळी मी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी वडिलांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्यासमोर त्यांच्या पोटच्या मुलीवर १० बाय १० च्या चाळीतील खोलीत सराईत गुंडांनी सामूहिक बलात्कार केला होता. ७ दिवसांनी आरोपी आग्रीपाडा झोपडपट्टी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांना पकडायला गेले असता आरोपी बळी आणि बाबा यांनी चॉपरने पोलिसांवर हल्ला केला. आमच्या एका पोलिसाला छातीवर १७ ते १८ टाके पडले होते. बळी आणि बाबा त्याकाळात सराईत गुंड होते आणि त्यांची दहशत देखील खूप होती. त्यांचा एन्काउंटर केल्यानंतर परिसरात दिवाळीप्रमाणे फटाके लावून सेलिब्रेशन करण्यात आलं. तो क्षण आज हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमुळे आठवला.