मुंबई : भायखळा रेल्वेस्थानकात शनिवारी सायंकाळी तरुणीने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे रहस्य उलगडले असून, गर्भवती असतानाही प्रियकर लग्नाला नकार देत असल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तो आता लग्नास तयार झाला आहे.
भायखळा रेल्वेस्थानकात शनिवारी सायंकाळी एका तरुणीने प्लॅटफॉर्म एकवर लोकल येत असताना त्यासमोर उभे राहून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहायक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि सुरक्षा रक्षक गजानन मुसळे हे पळत गेले आणि तिला बाजूला केले. त्यानंतर तिने पुन्हा प्लॅटफॉर्म २ वर आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियकराशी वाद झाल्याने तिने हा प्रयत्न केल्याची माहिती सुरुवातीला समजली होती.
मात्र, ती गर्भवती होती. भायखळा रेल्वेस्थानकाचे उपस्टेशन व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी सांगितले, प्रेम प्रकरणातून ही तरुणी गर्भवती होती. त्यामुळे तिने प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, तो तिला काही दिवस थांब असे सांगत होता. ती ऐकायला तयार नसल्याने त्यांचे भांडण झाले आणि त्यानंतर तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तिच्या प्रियकराला बोलावून दोघांची समजूत काढली. त्यानंतर तिला प्रियकरासोबत पाठविण्यात आले.