जळगाव : वराड, ता.धरणगाव येथील मूळ रहिवाशी असलेले फौजदार धनराज बाबुलाल शिरसाठ यांची पत्नी संगीता (२८) यांनी स्वत:च्या हाताने पतीच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता पोमके, ता.मुलचेरा जि.गडचिरोली येथे घडली. जखमी अवस्थेत संगीता यांना चंद्रपूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, संगीता हिच्या माहेरच्या लोकांनी मात्र, पती धनराज यांनीच तिच्यावर गोळी झाडली असून तशी माहिती घटनास्थळावर असलेल्या तिच्या मुलीनेच कळविल्याचे म्हणणे आहे. महिला कॉन्स्टेबलशी असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच पती फौजदार धनराज याने स्वत:जवळील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा आरोप संगीताचा भाऊ गणेश सपके याने केला आहे.गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रानुसार, धनराज शिरसाठ हे अहेरी उपविभागात येणाऱ्या मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पत्नी संगीता, मुलगी भार्गवी (९), मुलगा शुभम (४) व आई, वडील यांच्यासह मुलचेरा येथे शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. धनराज हे गुरुवारी नक्षलविरोधी अभियान राबवून दुपारी पोमके, मुलचेरा येथे परतले. त्यानंतर आई, वडीलांसह मुलचेरा येथे गेले होते.पत्नी संगीता व दोन मुले असे घरी होते. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान संगीता यांनी राहत्या घरात स्वत:वर डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी मारली. फायरींगचा आवाज ऐकून व आईने स्वत:वर गोळी झाडल्याचे पाहून भार्गवीने आरडाओरड केली पामके येथे तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून त्यांना चंद्रपुर येथे हलविले, मात्र सरकारी रुग्णालयात संगीता यांना मृत घोषीत करण्यात आले.
भाचीनेच घटना पाहिल्याचा दावामृत संगीता हिचा भाऊ गणेश सपके याने ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजता भाची भार्गवी हिने मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली की, पप्पांनी मम्मीला पिस्तुलची गोळी मारली. एक गोळी डोक्यात तर दुसरी कानाजवळ लागली. ती बेशुध्द आहे. ही माहिती देताना भार्गवी प्रचंड आक्रोश करीत होती, तिचा थरकाप उडत होता. यानंतर संगीताचे सासू-सासरे यांच्याशी संपर्क केला असता तिला चंद्रपूर येथे सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने बहिणाचा मृत्यू झाल्याचा निरोप रुग्णालयातून मिळाल्याचे सपके याने सांगितले.शिपायाचा झाला फौजदारदरम्यान, या घटनेतील मृत संगीता (२८) यांचे माहेर शहरातील सम्राट कॉलनीनजीकच्या लक्ष्मी नगरातील तर उपनिरीक्षक धनराज हे वराड, ता.धरणगाव येथील मुळ रहिवाशी आहेत. धनराज मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते, त्यानंतर जिल्ह्यात बदलून आले होते. शहर पोलीस ठाण्यात चार वर्ष नोकरी केली. २०१७ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती. तेथे मुलचेरा या तालुक्याच्या ठिकाणी त्याची नियुक्ती आहे. सरकारी निवासस्थानात पत्नी संगीता, मुलगी भार्गवी (७) व मुलगा शुभम (४) यांच्यासह वास्तव्याला होते. संगीता हिचा सात वषार्पूर्वी धनराज शिरसाठ याच्याशी विवाह झाला होता. जळगाव शहरात मोठा स्वागत समारंभ झाला होता. दुसरीसाठी हवा होता घटस्फोटसंगीता यांचा भाऊ गणेश सपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज यांचे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका विवाहित महिला कॉन्स्टेलबशी अनैतिक संबंध आहेत. दोघंही विवाहित असताना त्यांना नवीन संसार थाटायचा होता, त्यासाठी धनराज यांना पत्नीकडून घटस्फोट हवा होता. त्यासाठी ते वर्षभरापासून संगीता हिला त्रास देत होते. घटस्फोटासाठी त्रास असह्य होत असल्याने वराड येथे त्याच्या आई, वडीलांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. लॉकडाऊन लागू होण्याच्या काही दिवस आधीच धनराजचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ व आई सुशिलाबाई गडचिरोली येथे त्यांची समजूत घालण्यासाठी गेले होते. आता ते तेथेच असताना ही घटना घडली. दरम्यान,या घटनेची माहिती मिळाल्यावर जळगावातील माहेरची मंडळी तातडीने गडचिरोलीकडे रवाना झाले. खेडी पेट्रोल पंपावर वाहनात डिझेल टाकत असतानाच संगीताचा श्वास थांबल्याचा निरोप धडकला.
Coronavirus : जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी - माजी तीन नगरसेवकांमध्ये राडा