हुगली – पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी कन्हाईपूर येथे एका सॉफ्टवेअर युवक आणि पीएचडीच्या युवतीने आत्महत्या केली आहे. ३५ वर्षीय उच्च शिक्षण घेतलेल्या कपलने आपापल्या खोलीत गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं आहे. मृत मनोजीत सिन्हा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता तो कोलकाता येथे मोठ्या कंपनीत कामाला होता.
मृत युवक मूळचा वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम येथे राहणारा होता. परंतु नोकरीसाठी तो हुगलीच्या कन्हाईपूर येथे भाड्याच्या खोलीत राहायला होती. तर त्याची प्रेयसी पूजा ही पीएचडीचं शिक्षण घेत होती. एकाच परिसरात राहत असल्याने दोघंही एकमेकांच्या संपर्कात आले. कोरोना महामारीमुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी धोक्यात आली. तर दुसरीकडे दोघांचे वय ३५ झाल्याने त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव वाढत चालला होता. नोकरी जाण्याच्या भीतीने आणि आर्थिक कारणास्तव युवक मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली जगत होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
सुरुवातीला मनोजीतने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर ही बातमी परिसरात पसरताच त्याची प्रेयसी पूजाही अस्वस्थ झाली. त्यानंतर पूजानेही घरातच गळफास घेत आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. लक्ष्मी पूजेच्या दिवशी घरमालक भास्कर सेनगुप्ता प्रसाद देण्यासाठी मनोजीतच्या खोलीत गेले तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मनोजीतचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास तर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला.
या घटनेची माहिती मिळताच प्रेयसी रडत रडत मनोजीतच्या खोलीजवळ आली परंतु तिला घरात प्रवेश करण्यास मनाई केली. त्यानंतर पूजा तिच्या घरी परतली. पूजाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. त्यात तिने म्हटलं की, मागील काही दिवसांपासून मनोजीत आर्थिक कारणामुळे त्रस्त होता. नोकरीवरुन काढले जाण्याचीही भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे तो या जगातून निघून गेला. मीदेखील स्वत:ला संपवत आहे असं सांगितले. पूजाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर पूजा खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी खूप उशीर झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा खोलीचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पूजाचा मृतदेह आढळला. सध्या पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करत आहेत.