सोलापूर : जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची जोरात विक्री सुरू असून मागील दोन वर्षात अन्न प्रशासनाने तब्बल ८० हजार किलो गुटखा जप्त केला आहे. जवळपास सात कोटी रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून शंभराहून अधिक गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. गुटखा विक्री करणारी मोठी टोळी सोलापुरात कार्यरत असून त्यांचे धागेदोरे कर्नाटक पर्यंत पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागच्या वर्षी ७१ ठिकाणी अन्न निरीक्षकांनी धाडी टाकल्या. त्या ठिकाणी २८ हजार १२२ किलो गुटखा जप्त करून २७ वाहने ताब्यात घेतल्या आहेत. याची साधारण किंमत ३ कोटी ७८ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. या कारवाई एकूण ६२ जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. तसेच २८ गुटखा विक्री दुकाने सील केले आहेत. चालू वर्षात अन्न प्रशासनाने ६४ ठिकाणी धाडी टाकून १७ वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत ३ कोटी १९ लाख १६ हजार रूपये किंमतीचा ५२ हजार ७६३ किलो प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ४१ दुकाने सील केले असून ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.