भिवंडी - भिवंडीपोलिस परिमंडळ क्षेत्रात कोरोना काळात दुचाकी चोरी सह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावित, प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पोलिसांना तब्बल २० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून शांतीनगर, भोईवाडा व भिवंडी शहर या तीन पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पथकाने गुप्त बातमीदारां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध भागातून ७ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून ५ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या तब्बल ११ दुचाकी, १ रिक्षा, ७ मोबाईल व १ इलेक्ट्रिक मोटार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या ७ आरोपींमध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचासुद्धा समावेश आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या एक अल्पवयीन मुलासह एकास ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून २ लाख ३१ हजार किमतीच्या ६ दुचाकी, १ मोबाईल,१ इलेक्ट्रिक मोटार जप्त केली तर भोईवाडा पोलिस ठाणे व गुन्हे शाखा भिवंडी यांच्या संयुक्त कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याच्या जवळून ९० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तर भिवंडी शहर पोलिसांनी अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दरवा, मोहम्मद याकूब इसाक अली शाह उर्फ याकूब मामा व संजय शाम सोळंकी या तीन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून ३ दुचाकी, १ रिक्षा व ६ मोबाईल असा २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सर्व कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांना अटकाव घालण्यात यश मिळणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.