ठाणे : ठाणे शहरासह आजूबाजूच्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ 1 ते 5 मध्ये गुन्हे शाखेच्या भरोसा या विभागामार्फत शनिवार 26 डिसेंबर रोजी महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 454 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 363 तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे पोलीस आयुक्तालायांतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शनिवारी "महिला तक्रार निवारण दिनाचे" आयोजन केले जाते. त्यानुसार शनिवारी "महिला तक्रार निवारण दिन" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभुमी विचारात घेवून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 ते 5 मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या भरोसा सेल या विभागांमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या "महिला तक्रार निवारण दिन" या उपक्रमांमध्ये त्या-त्या परिसरातील महिला, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच एनजीओ पदाधिकारी, सदस्य, स्थानिक समाज सेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामध्ये महिलांच्या 454 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 363 तक्रारींमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन करून तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यामध्ये परिमंडळ 4 उल्हासनगर येथील सर्वाधिक 148 तक्रारींपैकी 118 तक्रारी निकाली काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, उर्वरीत तक्रारींची कायदेशीर बाबींनुसार पुर्तता करून निराकरण करण्यात येणार असल्याबाबत संबंधीत महिला तक्रारदार यांना आश्वासीत करण्यात आले. या उपक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून अशा प्रकारचे उपक्रम यापुढे देखील नियमित राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडुन जाहीर करण्यात आलेले आहे.