ठाणे : सोनसाखळी चोरणे आणि दुचाकी तसेच रिक्षांची चोरी करणाऱ्या तीघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाणे, कोनगाव, कोळसेवाडी, बाजारपेठ आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. तर त्यांच्यांकडून १३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, दुचाकी आणि रिक्षा असा तब्बल ६ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासून कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार या घटनांना आळा बसावा यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी याची गंभीर दखल घेत हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यानुसार गुप्त माहीतीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी कळवा मफतलाल झोपडपट्टीतून कलीम हारुन शेख (१७) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता, त्याने ३ चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून १ लाख १० हजारांचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दरम्यान मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आशिष उर्फ गब्बर कामेश्वर यादव (१९) रा. भोलानगर कळवा पूर्व याला १० जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने आपला साथीदार कुणाल उर्फ अविनाश मोरे (२०) रा. सातपुर नाशिक याचे नाव उघड केले. या दोघांच्या विरोधात कळवा, बाजारपेठ कल्याण, कोनगाव, कोळशेवाडी आदी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या दोघांकडून ५ रिक्षा व ४ मोटारसायकल असा ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांकडून १० गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून एकूण ५ लाख ८५ हजारांच्या रिक्षा आणि दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर या तीघांकडून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी असे १३ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ६ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.