नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींच्या वर गेली असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच काही ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे लग्न मंडपाऐवजी त्याला थेट पोलीस ठाणे गाठावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात ही घटना घडली आहे.
रामपुरामधील एका नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वरात निघण्यापुर्वी नवरदेव घोड्यावर बसून कुलदेवतेचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. मात्र त्या गल्लीत एका घरात शोकाकूल वातावरण होतं. शोकाकूल वातावरणात घरासमोरून नवरदेव जात असल्यामुळे त्यांना आवडले नाही. त्यामुळे नवरदेव असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी रोखले. आमचे कुटुंब दु:खात असताना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाले.
वादाचं रूपांतर हे पुढे हाणामारीत झाले. मुकेश यादव आणि चंदन यादव यांनी नवरदेवाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर नवरदेव बलराम पटेल याने लग्नाची वरात सासरच्या घरी न नेता नातेवाईकांसह थेट पोलीस स्टेशन गाठले. तसेच आरोपी चंदन यादव, मुकेश यादव आदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना संसर्गाचा धोका देखील अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साताजन्माची गाठ अवघ्या 23 दिवसांत सुटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
हृदयद्रावक! ...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव
कोरोना काळात लग्न सोहळ्याचं आयोजन करणं थेट जीवावर बेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या 23 दिवसांनंतर नवरदेवाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील अजय शर्मा या 25 वर्षीय तरुणाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. मात्र लग्नानंतर चार-पाच दिवसानंतर अजयची तब्येत बिघडली आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली. अजय पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला.