कानपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये चौक सराफा स्थित १०० वर्षे जुने सराफा दुकान असलेल्या केदारनाथ श्रीकृष्ण ज्वेलर्स आणि केएस बुलियनच्या चार शाखा, कारखाना, ऑफिस, शोरूम आणि निवास्थानावर प्राप्तिकर विभागाने रविवारी छापे मारले होते. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या तीन टीमचा तपास रविवारी रात्री आणि दुसऱ्या टीमचा तपास सोमवारी संध्याकाळी संपला. यादरम्यान तेथून ८.५ कोटी रुपयांची बेहिशोबी चांदी जप्त करण्यात आली. तसेच १६ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. याशिवाय काही लॉकरही सीझ करण्यात आले.
या फर्मचे मालक बॉबी अग्रवाल आणि सीए संजय अग्रवाल यांच्या घरावर सोमवारी संध्याकाळपर्यंत तपासाची कारवाई सुरू होती. या छाप्यात ८.५ कोटी रुपयांची बेहिशोबी चांदी जप्त करण्यात आली. या चांदीबाबत कुठलीही कागदपत्रे मिळाली नाहीत. जप्त करण्यात आलेली १५०० किलो चांदी ही वस्तूच्या रूपात सापडली आहे. या छाप्यामध्ये विविध संपत्तींची कागदपत्रेही सापडली आहेत. मात्र यामधील बहुतांश जुनी संपत्ती आहेत.
दरम्यान, फर्मच्या तपासामध्ये पर्चेज रसिस्टर तसेच सेल रजिस्टर मिळालेलं नाही. तसेच स्टॉक रजिस्टर आणि मेंटेनन्स रजिस्टरही मिळालेलं नाही. दरम्यान, संपूर्ण नोंदवही ही ५० वर्षे जुन्या रोकडच्या रूपात मिळाली तेव्हा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सगळीकडे इंटरनॅशनल अकाऊंट सिस्टिमचा जमाना आला असताना अजूनही या फर्मचा हिशेब हा आजही मुनीमजींच्या माध्यमातून रोकडच्या रूपात ठेवला जात होता. आता प्राप्तिकर विभागाकडून त्याची चाचपणी केली जात आहे.
केदारनाथ श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक स्वत: चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. केएस ब्रँड नावाने त्यांची चांदीची भांडी बाजारात विकली जातात. हा ब्रँड उत्तर प्रदेशमधील टॉप-३ ब्रँडमधील एक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही त्यांच्या चांदीच्या भांड्यांना खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या व्यवसायाचा हिशोब जुनाट पद्धतीने ठेवला जात असल्याने अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.