उत्तराखंडच्या गोपेश्वर येथे राहणाऱ्या चंपा गैरोला या आपल्या मुलीला भेटण्यासाठी डेहराडूनला गेल्या होत्या. त्या जेव्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा त्यांना असता घराचा दरवाजा तुटलेला दिसला. तसेच सासूच्या खोलीतील लॉकर तोडून त्यात ठेवलेले मौल्यवान दागिने गायब असल्यातचं दिसलं. अंदाजे ३५ ते ४० लाख किमतीचे दागिने चोरीला गेले होते.
चंपा यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चमोलीचे पोलीस अधीक्षक सर्वेश पनवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना पकडण्यासाठीचे आवश्यक निर्देश दिले. यानंतर पोलिसांची पथकं तयार करण्यात आली.
या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी चमोलीचे पोलीस उपअधीक्षक संजय गरब्याल यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केली असून तांत्रिक पथकाचीही मदत घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकट टीमच्या मदतीने पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं.
चौकशीत महिलेचा अल्पवयीन मुलगाचं या चोरीचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला डेहराडून येथून चमोली जिल्ह्यात आणलं. अल्पवयीने मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्याला ऑनलाईन गेमिंग, ट्रेडिंग आणि बऱ्याच काळापासून महागड्या वस्तू खरेदी करण्याचा शौक होता, ज्यासाठी त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते.
या चोरीत सहभागी असलेल्या अन्य एका अल्पवयीन मुलाकडूनही त्याने पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. या आर्थिक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी त्याने आपल्याच घरात चोरीचा कट रचला. आई आणि आजीच्या घरात लाखोंचे दागिने आहेत, ते विकून तो नफा कमवू शकतो, असं सांगून त्याने आपल्या दोन मित्रांनाही आपल्यासोबत येण्याचं आमिष दाखवलं. आई डेहराडूनला गेल्यावर याच संधीचा फायदा घेत मित्रांना घरी बोलावून ही चोरी केली.