नवी दिल्ली – पवन बन्सल ५ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांची नातेवाईकांनी हत्या केली होती. पवनला वाचवण्यासाठी त्याच्या आईनं त्याला दुसऱ्या गावाला पाठवलं. पण पवनच्या मनातून बापाची झालेली हत्या कधीच गेली नाही. बदला घेण्याची भावना वाढतच गेली. वडिलांची हत्या करणाऱ्यांना सोडायचं नाही हे त्याने ठरवलं आणि लहानपणापासून ट्रेनिंग आणि षडयंत्र रचण्यास सुरूवात केली.
TOI च्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये जेव्हा तो १८ वर्षांचा झाला तेव्हा त्याने वडिलांच्या कथित मारेकऱ्यावर हल्ला केला, परंतु तो थोडक्यात बचावला, या घटनेनंतर पोलिसांनी पवन बन्सल याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पण बदला घेण्याची त्याची तळमळ अजून संपलेली नव्हती. त्याने एक टोळी तयार करून २०१७ पासून अनेक गुन्हेगारी घटना घडवून आणल्या. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी त्याला लोणी (गाझियाबाद) सोडावे लागले.
एक एक करून ५ जणांना ठार केले
दरम्यान, एक एक करून त्याने आपल्या पाच शत्रूंचा काटा काढला. या हत्येनंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी त्याच्यावर २ लाखाचं बक्षीस ठेवले होते. बन्सल, आता २५ वर्षांचा झाला, त्याला त्याच्या वडिलांच्या कथित मारेकऱ्यांपैकी फक्त एकाला संपवायचं होतं. मात्र, गेल्या रविवारी रात्री तो चोरीची दुचाकी वापरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दिल्ली पोलिसांचे एसीपी मनु हिमांशू आणि एसएचओ रितेश शर्मा यांचे पथक रात्री १० वाजता चित्तरंजन पार्क पोलिस स्टेशन परिसरात मस्जिदजवळ वाहनांची तपासणी करत होते. तेवढ्यात एक भरधाव दुचाकी त्यांच्याजवळ आली. तपासासाठी थांबण्याचा इशारा केल्यावर दुचाकीस्वाराने वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडलेच. हा पवन बन्सल असल्याचं समोर आलं. बन्सल जी Yamaha R15 बाईक चालवत होता ती गेल्या वर्षी मालवीय नगरमधून चोरीला गेली होती. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान पवन हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस असल्याची माहिती समोर आल्याने तपासात सहभागी असलेले सर्व पोलीस हैराण झाले.