सूर्यकांत बाळापुरे
किल्लारी (जि. लातूर) : महिनाभरापासून गायब झालेल्या औसा तालुक्यातील लामजना (गोटेवाडी) येथील दोन मावस बहिणीचा तपास सुरू असलेल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असून जावयानेच दोघींचा खून करून पोत्यात गाठोडे बांधले. जवळच असलेल्या शेततळ्यात पुरले. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून एक गाय मारून त्यावर पुरण्यात आली. किल्लारी पोलिसांनी गुरूवारी दुपारी मृतदेह बाहेर काढले.
पोलिसांनी सांगितले, लामजना गावानजीक असलेल्या गोटेवाडी शिवारात शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (८२), त्रिवेणीबाई सगन सोनवणे (८५ दोघेही रा. लामजना ता. औसा जि. लातूर ) या दोघी बहिणी राहत होत्या. ७ जुलै रोजी त्या बेपत्ता झाल्या. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते, त्यामुळे अपहरण झाल्याची तक्रार ॲड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात दिली. ११ जुलैपासून किल्लारी पोलीस शोध घेत होते. मात्र, दोघी बहिणी ज्या घरात राहत होत्या तेथील परिस्थिती पाहून मृत शेवंताबाई यांचे जावई राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर (रा.लामजना) यांच्यावर संशय आला. कारण शेवंताबाई यांना मुलगा नसल्याने त्यांनी जमीन जावयाच्या नावावर न करता मुलीच्या नावे केली होती. नेमका हाच राग मनात धरून जावयाने कोयत्याने वार करून सासुचा खून केला. यावेळी मावस सासू असलेल्या त्रिवेणीबाई यांनी हा प्रकार बघितला असता पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचाही खून केला. दोघी बहिणींच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले. बाजूस असलेल्या शेततळ्यातील पाळूच्या कपारीत पुरून टाकले. पुन्हा कोणाला शंका येऊ नये, यासाठी एका गायीची हत्या करून त्या मृतदेहांवर पुरण्यात आल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सपोउपनि. अमोल गुंडे, बीट जमादार सचिन उस्तुर्गे, आबा इंगळे यांनी आरोपीच्या शोधात पुणे, मुंबई आदी ठिकाणी चकरा मारल्या, शेवटी मुंबईच्या घाटकोपर येथून आरोपीस अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रारंभी कलम ३६४ प्रमाणे होणाऱ्या तपासात ३०२ चे कलम वाढविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी सांगितले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच दिली कबुली...
संशयित आरोपी असलेल्या जावयास पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखवताच आरोपी राजू उर्फ त्र्यंबक गुरसिध्द नारायणकर याने सदरील गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली. बुधवारपासून शेततळ्यात जेसीबीच्या साह्याने उकरण्याचे काम केले जात आहे. तळ्यात पाणी असल्याने बीट जमादार उस्तुर्गे व आबा इंगळे, दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी रात्र जागून काढली. गुरूवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक सानप यांनी शवविच्छेदन केले.