ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने आपल्या पालकांवर जीवघेणा हल्ला केला. एड लिनसे असं या 51 वर्षीय व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वयाच्या 11 व्या वर्षी एडला त्याच्या पालकांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. यामुळे तो आई-वडिलांवर चांगलाच रागावला होता. बदला घेण्यासाठी आता 40 वर्षांनंतर त्याने आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
एड लिनसे हा एक अयशस्वी व्यापारी असून त्याच्यावर त्याच्या वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप याआधीही ठेवण्यात आला होता. मेट्रो न्यूजच्या रिपोर्टनुसार, एड लिनसे याने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री चेशायरमध्ये पालकांच्या 1.2 मिलियन पाउंडच्या फार्महाऊसमध्ये घुसला आणि त्याने 85 वर्षीय वडील निकोलस क्लेटन आणि 82 वर्षीय आई ज्युलिया यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
याहू न्यूजनुसार, लिनसेने त्याच्या वडिलांवर बेडरूममध्ये हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर तो त्याची आई असलेल्या खोलीत गेला आणि तिच्या डोक्यावर वार केले आणि तिच्या पाठीवर याची जखम आहे. 1980 मध्ये त्याला ऑल-बॉईज पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आले होते. येथे त्याचा खूप छळ करण्यात आला. या गोष्टीचा त्याला राग होता आणि त्यामुळे त्याला आपल्या आई-वडिलांकडून बदला घ्यायचा होता अशी माहिती त्याने दिली.
एडच्या पालकांच्या वकिलाने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरी बोर्डिंग स्कूलमध्ये काय घडले याचा कधीही उल्लेख केला नाही. आई सांगते की एडची आमच्याबद्दल खूप दिवसांपासून कटुता होती. असे असतानाही त्यांनी आरोपीशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला नेहमीच आर्थिक मदत केली. पालकांचे म्हणणे आहे की, एडचा असा विश्वास होता की बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला झालेल्या त्रासाची पालकांनी भरपाई केली पाहिजे. सध्या या प्रकरणात न्यायालयाने आरोपी एडला त्याच्या आई-वडिलांवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"