वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य वसई सोडण्याआधीच सापडला.
नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड काल रात्री साडेअकराच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर होते. वसईच्या हद्दीत त्यांना एक मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. तोटेवाड यांनी लगेच आपले वाहन थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा तो मुलगा काहीच सांगायला तयार नव्हता. माझे हात पाय तोडा, मारून टाका पण मी घरचा पत्ता सांगणार नाही, असे त्याने सांगितले. त्या मुलाची नाजूक मानसिक अवस्था पाहून पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याचे ठरवले. पोलीस त्याला आपल्या गाडीतून रात्रभर फिरवून समजूत काढत होते. मात्र, तो काहीच ताकास तूर लागू देत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी कुठे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे का ते तपासले. तर अशी कुठलीही तक्रार नव्हती. त्यामुळे पेच आणखीन वाढला.
तोटेवाड यांनी समजूत काढल्यानंतर दोन तासांनी त्याने आपले नाव सौम्य सिंह (वय १२) असल्याचे सांगितले. तो नालासोपारा पश्चिमेच्या सेंट्रल पार्क येथे राहणारा होता. आई वडील सतत अभ्यासासाठी दबाब टाकत असल्याने तो वैतागला होता आणि घर सोडून निघाला होता. लोकलल ट्रेन पकडून मुंबईला जाऊन काहीतरी काम करून रहायचे असे त्याने ठरवले होते. मात्र पोलिसांना तो वेळीच सापडल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्या पालकांनी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत बोलताना उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले की, हा चांगल्या घरातील मुलगा होता. पुन्हा कधी घरी जायचे नाही या निश्चयाने तो बाहेर पडला होता त्याच्याकडे मोबाईल नव्हता की पैसे नव्हते. ट्रेनने मुंबईला गेला असता तर समाजकंटकांच्या हाती पडला असता. आणि नको ते घडले असते, वाम मार्गाला गेला असता असे त्यांनी पुढे सांगितले.