नवी दिल्ली - टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूचं गुढ वाढतच चाललं आहे. सुरुवातीला सोनालीचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आले. परंतु आता या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सांगवान यांची गोवा पोलीस चौकशी करत आहेत. सोनाली फोगटच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी तीक्ष्ण वस्तूंच्या जखमांच्या खुणा असल्याचे समोर आलं आहे.
त्यातच आता सोनाली फोगटच्या मृत्यूशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यात मंगळवारी २३ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजता सोनाली ठीक होती हे दिसून येते. परंतु त्यानंतर १० वाजता सोनालीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. त्यामुळे या ४ तासांत काय घडलं? हा प्रश्न निर्माण होतो. पोलीस आता या घटनेशी सखोल चौकशी करत असून सोनालीच्या मृत्युपूर्वीचे २ तास आधीचे महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे सुधीर सांगवान आणि सुखविंदर सांगवान यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघं सोनालीचे स्टाफ मेंबर होते. सुधीर सोनालीचा पीए होता. सोनालीच्या कुटुंबाने सुधीरवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय षडयंत्रापोटी सोनालीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. सध्या या दोन्ही संशयितांशी चौकशी सुरू आहे. परंतु सोनालीच्या शवविच्छेदन अहवालानं सगळेच हैराण झाले आहेत.
सोनालीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. सोनालीच्या मृत्यूचं कारण पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सांगितले नाही. सध्या विसरा आणि टिस्यू तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवलं आहे. मात्र गोवा पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि सोनालीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय स्टाफची पोलीस चौकशी करत आहेत. फार्म हाऊसवर होणार अंत्यसंस्कारसोनालीचं पार्थिव आज रात्री गोव्यातून हरियाणाच्या हिसार इथं आणलं जाईल. शुक्रवारी फार्म हाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सोनालीचा मृत्यू २३ ऑगस्टला सकाळी १० वाजता गोव्यातील एका हॉटेलमध्ये झाल्याचं समोर आले. भाजपाच्या काही लोकांसोबत ती गोव्याला गेली होती. सोनालीच्या मृत्यूवर सर्वात आधी तिची बहिण रेमनं प्रश्न उपस्थित केले. जेवण झाल्यानंतर तिला अस्वस्थ वाटत होते असं सोनालीने तिच्या आईला म्हटलं होते. कदाचित तिच्या जेवणात काही मिसळले असावे असा संशय कुटुंबाने व्यक्त केला.