भाजपाची नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटचा मृतदेह गुरुवारी रात्री गोव्याहून दिल्लीला नेण्यात आला आहे. तेथून रात्रीच हिसारला नेण्यात आला असून आज त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोनालीच्या कुटुंबीयांनी जोवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. गोवा पोलिसांनी तिचा हार्ट अटॅकने मृत्यू असे सुरुवातीला म्हटले होते. परंतू नंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी गुरुवारी सोनालीचा पीए आणि मित्राला अटक केली होती.
दरम्यान, सोनाली फोगाटचा पोस्टमार्टेम अहवाल आला आहे. तिच्या शरीरावर टोकदार वस्तूने जखमा झाल्याचे आढळले आहे. पोस्टमार्टेमच्या पुढील तपासणीसाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. सोनालीवर हिसारच्या ऋषीनगरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोनालीचा भाऊ रिंकू फोगाटने सांगितले की, यात काहीतरी गडबड असल्याचे आम्हाला वाटत होते, ते आता समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासावर समाधानी आहोत. पुढचा तपास पाहूनच यावर बोलू शकू. आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.
गोव्याचे डीसीपी दळवी यांना या प्रकरणी निर्णय घेण्याची मुभा असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. सोनालीच्या शरीरावर अनेक खुणा आहेत. तिच्या मृत्यूप्रकरणी हत्येचे कलम ३०२ जोडण्यात आले आहे. तिच्यासोबत २२ ऑगस्टला तिचा पीए सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी हे गोव्यात आले होते. त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोघांनाही अटक करण्यात आल्याचे दळवी यांनी सांगितले.
गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) च्या फॉरेन्सिक तज्ञांच्या गटाने गुरुवारी सकाळी पोस्टमॉर्टम केले. डॉक्टर सुनील चिंबोळकर यांनी त्यांच्या अहवालात मृत्यूच्या कारणाबाबत त्यांचे मत राखून ठेवले आहे. रासायनिक विश्लेषण होईपर्यंत मृत्यूच्या कारणाबाबत मत राखून ठेवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. पेशींचे हिस्टोपॅथॉलॉजी आणि सेरोलॉजिकल अहवाल राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र, शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.