कल्याण - कल्याण डोंबिवली परिसरातील महिलांना लक्ष्य करत इमारतीजवळ, रस्त्यावरून चालताना त्यांच्या गळयातील सोन्याचे दागिने आणि पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी चोरणा-या मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर उर्फ संजय इराणी (२०, रा. आंबिवली) तसेच, मोबाईल दुकान फोडणा-या टोळीतील सायमा शाह (२०, रा. कल्याण) आणि इसरार अहमद (३०, रा. उत्तरप्रदेश) या तिघांना कल्याण परिमंडळ ३ च्या ‘अँटी चैन स्नॅचिंग’ पथकाने अटक केली. या तिघांकडुन सुमारे तीन लाख ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून महिलांना लक्ष्य करुन त्यांच्या गळ्यातील किमती ऐवज हिसकावून पळुन जाणारा मुस्तफा उर्फ मुस्सु आंबिवली येथील रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे या परिसरात सापळा लावत पथकाने मुस्तफाला अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच, मोबाईल दुकान फोडून चोरी करणा-या सायमा आणि तिचा साथीदार अहमद या दोघांनाही पथकाने अटक करित त्यांच्याकडून एक लाख ३४ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाणे पोलीस सहआयुक्त, गुन्हे शाखा मधुकर पांडे, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग डॉ.प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनानुसार 'अँटी चैन स्नाचिंग' कल्याण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.