मुंबई - रेल्वे स्थानकांत अनेक चोर वेगळ्या युक्त्या लढवून चोर्या करतात. बर्याच वेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते हात साफ करतात. बिझनेसमनसारखा पेहराव करुन अगदी प्रोफेशनल दिसणारा साखळी चोर अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महागडे कपडे घालून तो अंधेरी स्थानकात सोनसाखळ्या चोरत होता. मात्र, अंधेरी स्थानकातील आरपीएफ जवानांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे तपासणी केली आणि तो सापडला. आरपीएफ पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. कमल सागर शुक्ला (३० वर्षे) असे या आरोपीचे नाव असून वसई परिसरात तो राहत होता.
लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोरण्याचे त्याने सत्र सुरू केले होते. बर्याचदा रेल्वे पोलिसांना हुलकावणी देऊन तो पसार होत असे. चांगले कपडे आणि दिसायला अगदी प्रोेफेशनल असल्यामुळे लोकांना सुद्धा त्याचा संशय येत नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने आतापर्यंत चोर्या केल्या होत्या. मागच्या महिन्यात २९ डिसेंबरला एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी शुक्ला आढळून आला होता. मात्र चांगल्या घराण्यातील वाटल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला नाही, मात्र १९ डिसेंबरला पुन्हा तो त्याच परिसरात फिरत असल्याचे आरपीएफच्या जवानांनी पाहिले आणि तात्काळ त्याला अटक केली. तपासणी केली असता त्याच्याकडे चोरी केलेली सोनसाखळी आढळून आली. त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.