मुंबई : गायक सोनू निगम यांचे वडील अगमकुमार यांच्या ओशिवऱ्यातील घरात जवळपास ७२ लाखांची घरफोडी करणाऱ्या रमजान मुजावर उर्फ रेहान (३०) यास गुरुवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी अटक केली. कोल्हापूरमधील त्याच्या घरातून चोरीची रक्कम हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
सोनूची बहीण निकिता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात त्यांच्या माजी कार चालकावर संशय व्यक्त केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तांत्रिक तपास करत रेहानला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तेव्हा अगमकुमार यांच्या घरातून चोरलेले पैसे त्याने त्याच्या कोल्हापूर येथील घरात लपवल्याचे पोलिसांना समजले.
चोरलेल्या एकूण रकमेपैकी २० ते ३० हजार रुपयांची रक्कम त्याने खर्च केली. मात्र उर्वरित रोकड ओशिवरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक रजनी साळुंखे आणि पथकाने हस्तगत केली. रेहानने हा प्रकार का केला, याबाबत अद्याप ठोस माहिती उघड होऊ शकलेली नसून, नोकरीवरून काढल्याच्या रागातच त्याने चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.