राजस्थानच्या बिकानेरमधील नापासर शहरात एक अनोखी घटना समोर आली आहे. पोलिसांना रस्त्यात एक कार सापडली. कारची नंबर प्लेट गायब होती. मात्र कारवर तीन नोट्स चिटकवल्या होत्या. ज्यामुळे पोलिसांना कार मालकापर्यंत पोहोचता आलं. एका व्यक्तीने जयपूर-बिकानेर महामार्गावरील एका हॉटेलजवळ कार पार्क केलेली पाहिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत त्याने लगेचच पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यावर हाताने लिहिलेल्या तीन नोट्स आढळून आल्या. या तीन नोट्संमध्ये चोरीबाबत सांगितलं होतं. मागच्या खिडकीवर लावलेल्या पहिल्या चिठ्ठीत लिहिलं होतं, "ही कार दिल्लीच्या पालम, येथून चोरली आहे. मला माफ करा." तसेच या चिठ्ठीवर रजिस्ट्रेशन नंबर 'DL 9 CA Z2937' लिहिला होता, जो पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला.
दुसऱ्या नोटमध्ये 'आय लव्ह माय इंडिया' असं लिहिलं होतं. तिसरी नोट विंडस्क्रीनवर चिकटवली होती. ज्यावर लिहिलं होतं, "ही कार दिल्लीतून चोरीली आहे. कृपया पोलिसांना फोन करून माहिती द्या. हे अत्यंत आवश्यक आहे." या तीन नोट्सच्या माध्यमातून ही चोरीची घटना असल्याचं समजलं. मात्र चोरट्याने हे का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कारच्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून पोलिसांना ही कार दिल्लीतील पालम कॉलनी येथे राहणाऱ्या व्यक्तीची असल्याचं समजलं. या कारच्या मालकाने १० ऑक्टोबर रोजी चोरीची तक्रार केली होती. बिकानेर ते दिल्ली हे अंतर सुमारे ४५० किलोमीटर असून, या कारचा वापर एखाद्या गुन्ह्यासाठी झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
नापासर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जसवीर सिंह यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांचं एक पथक बिकानेरला पोहोचलं असून कारचा मालक विनय कुमारही त्यांच्यासोबत आहे. आम्ही ही कार त्यांच्या ताब्यात देत आहोत. या कारचा वापर गुन्हा करण्यासाठी झाला होता की, नाही हे सांगता येणार नाही. हा तपासाचा विषय आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.