दौसा - राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेला जाण्यापूर्वी स्वत:चा जीव दिला आहे. चांगले मार्क आणण्यासाठी तिच्यावर दबाव होता. १६ मार्चपासून राज्यात बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. गुरुवारी सकाळी मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना या घटनेत सुसाईड नोट आढळली आहे. या घटनेने कुटुंबाला हादरा बसला आहे. या घटनेवर एका IRS अधिकाऱ्याने ट्विट करून त्यांची कहानी सांगितली आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश मीणा यांनी ही बातमी शेअर करत त्यांचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले की, मी दहावीला नापास झालो होतो. त्यानंतर पुढच्या परीक्षेत ४३ टक्क्यांनी पास झालो. १२ वीत ५६ टक्के तर बीए पदवी ४८ टक्क्यांनी पास केली. UPSC च्या सामान्य परीक्षेत एकूण ३ वेळा सिलेक्ट झालो होतो असं त्यांनी म्हटलं.
काय आहे घटना?या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, आई-बाबा मला माफ करा, मी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स आणू शकत नाही. मी दहावीच्या परीक्षेमुळे त्रस्त झालीय. मला अजून सहन करता येत नाही. मी तुमच्यावर प्रेम करते. आई-बाबा मला माफ करा असं म्हणत तिने स्माईली इमोजी बनवली आहे.
या घटनेवर यूजर्स म्हणाले की, ही घटना अत्यंत दु:खद आहे. मुलांनी जिद्द हरायला नको, प्रकाश मीणा सरांना पाहा. त्यांनी त्यांचे अपयश कसं यशात रुपांतरित केले. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. मी १० वी पास केलीय. १० वीत मला ५३.६७ टक्के मिळाले, आता ११ वीत आहे. सर, मी यूपीएससी तयारी करू शकतो का असं त्याने विचारले. तर आजपासून मी मुलांवर शिक्षणासाठी, मार्क्ससाठी दबाव टाकणार नाही. मुलांना दोष देऊन चालणार नाही. पालकांनी मुलांवर दडपण आणणं चुकीचे आहे. मुलांवर दबाव न आणता चांगले मार्क्स मिळावेत यासाठी पालकांनी तसे वातावरण तयार हवं असं यूजर्स म्हणाले.