साऊथ आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये मोठी खळबळजनक घटना घडली आहे. बेकायदेशीर असलेल्या गोल्ड माईन्सजवळ म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या ८ मॉडेल्सवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यांना एका गँगने ताब्यात घेतले आणि बंदुकीच्या धाकावर त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर ८० हून अधिक लोकांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
जोहान्सबर्ग जवळच्या क्रुगर्सडॉर्पमध्ये २८ जुलैला हा प्रकार घडला आहे. एक प्रॉडक्शन टीम जंगलात शुटिंग करण्यासाठी गेली होती. या मॉडेल्सचे वय १९ ते ३७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सोन्याची तस्करी, उत्खनन करणाऱ्या या गँगने या मॉडेल्सना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील व क्रू कडील सर्व साहित्यही काढून घेतले.
गृह मंत्री भेकी सेले म्हणाले - क्रुगर्सडॉर्पमध्ये जे काही घडले ते संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे आहे. या घटनेमागे खाणींमध्ये काम करणाऱ्या बेकायदा घुसलेल्या परप्रांतीयांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक लोक या घुसखोरांना झमा झमा म्हणतात. याप्रकरणी 84 जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी चकमकीमध्ये दोन आरोपींना ठार केले आहे. तर एक आरोपी गंभीर जखमी आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर बेकायदा राहणे आणि चोरीच्या प्रकरणांत कोर्टात सुनावणी सुरु आहे.
राष्ट्रीय पोलीस प्रमुख फॅनी मासेमोला यांनी सांगितले की, जर बलात्कार प्रकरणांशी संबंधित असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. मात्र, अद्यापपर्यंत सामूहिक बलात्कार प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बलात्कारानंतर पोलीस तिथे पोहोचले...म्युझिक व्हिडिओ शूट करणाऱ्या लोकांचा आवाज ऐकून गँगचे लोक तिथे आले होते. व्हिडिओ शूटसाठी 12 महिला आणि 10 पुरुष तिथे उपस्थित होते. सर्व मॉडेल्स जोहान्सबर्ग येथून एका दिवसाच्या बोलीवर तिथे आल्या होत्या. गँग तिथे पोहोचताच या मॉडेल्सनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गोळीबार केल्याने हा प्रयत्न फसला. यानंतर या गँगने या मॉडेलवर बलात्कार केला. शुटिंगचे साहित्य लुटून नेत असताना तिथे पोलिस पोहोचले. यावेळी दोन्ही बाजुंनी चकमक सुरु झाली. गँगपैकी दोघे ठार झाले, एक जखमी झाला तर १७ जण तिथून फरार झाले.