धुळे : शेतात ठेवलेला ६० हजार रुपये किमतीचा ३० क्विंटल सोयाबीन चोरट्याने शिताफीने लांबविला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी पिंपळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. साक्री तालुक्यातील सामोडे येथील शिक्षक ललीत सुरेशराव शिंदे (वय ३२) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील सामोडे ते दहिवेल रोडलगत शेत आहे.
या शेतात कांद्याची चाळ उभारण्यात आलेली आहे. या कांद्याच्या चाळीत ठेवण्यात आलेला ३० क्विंटल वजनाचा ६० हजार रुपये किमतीचा सोयाबीन चोरट्याने शिताफीने लांबविला. चोरीची ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे ललित शिंदे हे शेतात आले. कांदा चाळीत ठेवलेला सोयाबीन त्यांना दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही त्याचा उपयोग झाला नाही.
सोयाबीन चोरट्याने लांबविल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोज शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.