ठाणे - विद्यार्थांना, लहान मुलांसह तरुणांना खुलेआम गांजा, गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही उत्तम कामगिरी ठाणे पोलीस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे, भिवंडी शहरात केली. या कारवाईत 8 लाख 65 हजार 713 रुपयांचा गांजा, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या मोहिमेतंर्गत पोलिसांनी शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाया होणार आहेत.
विद्यार्थी, लहान मुलांसह तरुणांमधील अमली पदार्थांचे वाढते सेवन लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन म्हणून अमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात विशेष "धाड" मोहीम हाती घेतली. या मोहिमेतंर्गत वागळे इस्टेट परिसरातील पाईपलाईन झोपडपट्टीजवळ भररस्त्यात मुला-मुलींना गांजा विकणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत 95 हजार रुपयांचा 6 किलो गांजा पोलिसांनी जप्त करून आरोपीला एनडीपीएस अॅक्ट कलम 8(क), 20 नुसार अटक केली.दरम्यान, 12 सप्टेंबर रोजी भिवंडी शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेसर्स न्यू रॉयल सुपारी अॅण्ड जनरल स्टोअर्स व न्यू बॉम्बे सुपारी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनमधून 7 लाख 70 हजार 713 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून गोडाऊन सील केले. ही उत्तम कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, सहाय्यक पोलिस निरिक्षक वालझाडे, पोलिस उपनिरीक्षक बांगर, पोलिस उपनिरीक्षक धुमाळ यांनी मालमत्ता कक्षाचे अधिकारी, अंमलदार व अन्न-औषध प्रशासनाच्या मदतीने केली.