अकोला :
आशिया कपमध्ये भारत व पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात सट्टा बाजार चालविणाऱ्या दाणा बाजारातील अड्ड्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणावरून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दाणा बाजारातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून छापा टाकला. या ठिकाणावरून सीसीर सुकुमार मनना, राहणार सराफा बाजार, तपन खुदीराम मांजा, राहणार दगडी फुल, पलक सुधीर गुचोत राहणार पोळा चौक, जीवन धोंडीराम पाटील राहणार जुने शहर व सुमित दिलीप खेडकर राहणार जुना बाळापुर नाका या पाच जणांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच मोबाईल, दुचाकी, चार चाकी व रोख रक्कम असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पाच जणांविरुद्ध सिटी कोतवांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.