मुक्ताईनगर जि. जळगाव :
जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या चौकशीसाठी नाशिक आयुक्त यांच्याकडून विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे पथक मुक्ताईनगर येथे तळ ठोकून आहे. पथकामध्ये चार ते पाच पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते सायबर सेलचे विशेष प्रशिक्षित अधिकारी आहेत. रोहिणी खडसे यांच्यावर २७ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान सूतगिरणी ते कोथळी या दरम्यानच्या रस्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याबाबत त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली होता. त्यावरुन शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा म्हणून पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.