कल्याण: अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या विरोधात भाषण करणाऱ्या ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुख नीरज कुमार याच्यासह पाच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील दुर्गा सोसायटीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची हत्या एका तरुणाने केली.
या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर २० आ’गस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात पोहचला असता त्याठिकाणी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. यावेळी युवा सेना शहर प्रमुख नीरज कुमार यांनी भाषण केले. हे भाषण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे होते. कल्याण पूर्वेत नशेखोर खुले आम फिरतात. तसेच नागरीकांवर शस्त्रांनी हल्ले होता. मुलीची तिच्या आई समोर चाकूने हत्या केली जाते. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न होतो. आम्ही करदाते नागरीक आहोत.
आमची सुरक्षा करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या बदल्यात पोलिसांना पगार मिळतो. पोलिसांना किती हप्ता पाहिजे. पगार पुरत नसेल तर आम्ही लोकवर्गी काढून पैसा देऊ असे भाषण नीरज कुमार यांनी केले होते. नीरज कुमार यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्याची दखल घेत पोलिसांच्या विरोधात भाषण केल्या प्रकरणी नीरज कुमारसह पाच जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरज कुमार हे व्यवसायाने वकील आहेत. यासंदर्भात नीरज कुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पोलिसांना जाब विचारण्याकरीता मोर्चा काढला होता. पोलिसाना मोर्चा झोंबला आहे. पोलिसांनी आमच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या मार्गाने पोलिसांना हार घालून त्यांची आरती ओवाळू. सत्य मांडण्याचे काम करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि गृह मंत्रालयाचा निषेध करतो . पोलिसांकडून यासंदर्भात अद्याप बोलावणे आलेले नाही. बोलविणे आल्यास आम्ही नक्कीच जाऊ.