मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवास्थानाबाहेर सापडलेली स्फोटकानं भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता गती येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) पथकानं आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. तसेच दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ते पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आज पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झालेले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात आता जलद तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी सापडल्याचा तपास NIAकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात आज NIA च्या पथकाने पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. या टीममध्ये IG दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने सुरुवातीला पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचीही त्यांनी भेट घेतली. NIA च्या पथकातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि विविध मुद्दे मुंबई पोलीसांकडून मागण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे NIA मुंबईत कधीही आपल्या तपासाला सुरुवात करु शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.