नितिन पंडीत
भिवंडी - भरधाव रिक्षा खड्यात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना भिवंडी कल्याण महामार्गावर घडली असून हा अपघात व्हिडीओ एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून अपघाताचा हा व्हिडीओ मागील दहा दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भिवंडी कल्याण मार्गावर मागील तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव छाप गतीने काम सुरू आहे. त्यामुळे यामार्गावर अनेक अपघात होऊन कोणी जखमी झाले तर अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे आहे. असाच एक खड्डा कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर आहे. याच खड्यामुळे १० दिवसापूर्वी रिक्षा पटली होऊन अपघात झाला होता. याप्रकरणी त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्याच अपघाताच्या थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सध्या ठेकेदाराकडून हा खड्डा पेव्हरब्लॉक च्या माध्यमातून भरण्यात आला आहे. मात्र अपघाताचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान या रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत आपण वेळोवेळी एमएससीआरडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची तक्रार देखील अनेक वेळा केली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाही. हे दुर्दैव असून यापुढे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे परेश चौधरी यांनी दिली आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून या खड्डेमय रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री येत असतात मात्र मंत्र्यांची पाठ फिरली की परिस्थिती जैसे थे अशीच होते त्यामुळे येथील खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.