अंबाजोगाई (जि. बीड) : जालना येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन गेलेल्या नववीतील विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षकाने छेडछाड करून कारमध्येच तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार १७ आॅक्टोबर रोजी जालना व अंबाजोगाईच्या क्रीडा संकुलावर घडला. या प्रकरणातील आरोपी शिक्षक श्याम दिगंबर वारकड (४३) याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
अंबाजोगाई येथील एका विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला श्याम दिगंबर वारकड याने जालना येथे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी कारमध्ये सोबत नेले. जालना येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडित बालिकेस आपण जेवणासाठी जाऊ, असा बहाणा करून त्याने तिच्याशी छेडछाड केली.
जालना येथून परत अंबाजोगाई येथे आल्यानंतर रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान अंबाजोगाईच्या क्रीडा संकुलावर कार घेऊन थांबला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेची वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पिडीत बालिकेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. मात्र, ती निराश व उदास दिसू लागल्याने तिच्या उदासीनतेचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व आरोपी क्रीडा शिक्षक श्याम दिगंबर वारकड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात आरोपीवर कलम ३५४ (अ)(१), कलम ३७६ (१)(एफ) ५०६ भा.दं.वि. आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या शिक्षकाला तातडीने बेड्या ठोकल्या.
घटनेचा निषेध अंबाजोगाई शहरात ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला.
तपास लवकर पूर्ण करणार आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून फास्ट ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत.- राहुल धस, पोलीस उपअधीक्षक