पूनम अपराज
ठाणे शहरात एक अभिनव उपक्रम राबवून बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांना वचक बसवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे वाहतूक पोलिसांचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर प्रलंबित असलेली ई - चलान वसूल करण्यासाठी विशेष मोहीम १ डिसेंबरपासून राबण्यात आली आहे. विशेष म्हणजे १ डिसेंबर ते १० डिसेंबर या १० दिवसांच्या कालावधीत जवळपास १ कोटींचा हा थकलेला दंड वसूल करण्यात आला असून या मोहिमेस चांगले यश मिळत असल्याची माहित उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अलीकडच्या डिजिटल काळात आणि पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी वाहतूक पोलीस दलात ई - चलान प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. ठाणे शहरात २०१९ पासून या प्रणालीची अंमलबाजवणी करण्यात आली आहे. २०१९ ते २०२० या एका वर्षात १५ कोटींचा दंड थकीत होता. तसेच मोटार वाहन कायदा मोडल्यानंतर वाहतूक पोलीस त्याच्या गाडीचा फोटो काढून संबंधित गाडी मालकाला त्याच्या ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर दंड भरण्याबाबत चलान पाठवले जाते. हे चलान भरण्यासाठी ड्यू डेट म्हणजेच ठराविक कालमर्यादा नसल्याने कोटींची शासनाची रक्कम थकलेली आहे. मुंबई वाहतूक विभागाला ई-चलान पद्धतीने ३१७ कोटींचा दंड वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच ठाणे शहरात देखील अंदाजे १५ कोटींचा दंड वसूल करण्याचे आव्हान होते. तसेच दंड तात्काळ भरायचा नसल्याचे वाहने बेदारकपणे चालण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे अपघातांचे देखील प्रमाण वाढले असल्याने वाहन चालकांवर वाचक बसावा म्हणून जागेवरच चलान वसूल करण्याची मोहीम १ डिसेंबरपासून राबवली असल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
दररोज २ ते सव्वा २ लाख दंड ठाणे शहरात वाहतूक पोलीस वसूल करत होते. मात्र, ऑन द स्पॉट थकीतसह त्यावेळी वाहतुकीचा नियम मोडल्याबाबत दंड ई-चलनद्वारे वसूल केला जात आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून दिवसाला १० लाखाच्या आसपास दंड वसूल केला जात आहे. कालपर्यंत ९२ लाख आणि आज १ कोटी इतका दंड वसूल केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर वचक बसावा तसेच थकीत ईचलान वसूल करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. १० दिवसांत १५-२० टक्के वसूल करण्यात यश मिळालं आहे. सुरुवातीला हाय प्रोफाइल गाड्यांच्या चालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून संबंधित गाडीवरील थकीत ई चलान देखील सोबत वसूल केले जात आहे. लॉकडाउनचा काळ आर्थिकदृष्ट्या खडतर असल्याने तळागाळातील रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहन चालकांवर शेवटच्या टप्प्यात अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.