मुंबई - अभिलेखावरील गुन्हेगारावर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत जाधव (५७) याला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
१४ जानेवारीला गुन्हेगाराविरोधात वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपी जामिनावर मुक्त झाला. त्यानंतर त्याच्याविरोधात तडीपार आणि एमपीडीए प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी चंद्रकांत जाधवने १९ जानेवारीला ७० हजार लाचेची मागणी केली. मात्र, गुन्हेगाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पडताळणी केल्यानंतर एसीबीने लाचेची पहिली रक्कम म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना २० जानेवारीला सापळा रचून रंगेहाथ अटक केली.