मुंबई - फिर्यादीला मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरविलेल्या मुलाबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास मारहाण केली. तक्रारदाराच्या कानाखाली मारल्याने त्याचे डोके खुर्चीवर व टेबलावर आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली. त्यानंतर गणेश जलगावकर (५५) यांनी माहीम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याविरोधात मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस उपनिरीक्षक सातव फरार आहे. माहीम कॉजवे येथे राहणारे गणेश जलगावकर (५५) यांच्या इमारतीतील नदीम शेख यांची दोन लहान मुले गुरुवारी बेपत्ता झाली होती. त्यांचा शोध घेऊनही ती मुले न आढळल्यामुळे शेख यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांचा शोध घेतला, मात्र मुले आढळून आली नाहीत. ही बाब जळगावकर यांना समजल्यानंतर ते शेख आणि त्यांचा भाऊ या दोघांसोबत माहीम पोलीस ठाण्यात मध्यरात्री २ वाजता गेले. दरम्यान जलगावकर यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याकडे मुलांच्या शोधाबाबत चौकशी केली असता फिर्यादी यांना सातव यांनी मारहाण करीत टेबलावर पाडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर जलगावकर यांना कोठडीत बंद करून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सही करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी सही करण्यास नकार देताच पुन्हा जलगावकर यांना सातव यांनी मारहाण केली. त्यानंतर माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गडांकुश आल्यानंतर जलगावकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. नंतर सातव यांच्याविरोधात माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३०९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा १२० (ब), ११२ अन्वये गुन्हा दाखल केली.
खाकीला काळिमा! तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 8:19 PM
माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३०९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा १२० (ब), ११२ अन्वये गुन्हा दाखल केली.
ठळक मुद्दे गणेश जलगावकर (५५) यांनी माहीम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याविरोधात मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या कानाखाली मारल्याने त्याचे डोके खुर्चीवर व टेबलावर आपटले.