मुंबई - १० हजारांची लाच घेताना दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण (वय ३०) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. कपड्याच्या व्यापाऱ्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक चव्हाणने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून रंगेहाथ चव्हाणला लाच स्वीकारताना अटक केली आहे.
कपड्याचा व्यापार असलेल्या एका इसमाविरोधात ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे न दिल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या तक्रार अर्जाविषयी पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता ज्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल आहे. त्या व्यक्तीकडे त्याच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी चव्हाणने १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधित कापड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला *(एसीबी ) याप्रकरणी माहिती दिली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून चव्हाणला रंगेहाथ पकडले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.