नवी दिल्ली : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक केली आहे. राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. (spy isi pakistan intelligence agency arrested delhi police crime branch pokharan rajasthan)
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा असा दावा आहे की, हबीब खानच्या अटकेमुळे मोठे हेरगिरीचे जाळे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या आयएसआय एजंटनेही अनेक खुलासे केले आहेत. गुन्हे शाखेची टीम हबीब खानची सतत चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीब खानला राजस्थानच्या पोखरण येथून अटक करण्यात आली आहे. तो राजस्थानमधील बीकानेरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
हबीब खान हा सामाजिक घडामोडींत सुद्धा सक्रीय होता. हबीब खान गेली कित्येक वर्षांपासून कंत्राटदार म्हणून काम करत आहे, असे सांगण्यात येते. सध्या हबीब खान याच्याकडे भारतीय लष्कराच्या भागात भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट होते. तो लष्करी भागात भाजीपाला पुरवठा करीत होता. तसेच, हबीब खान हा पोखरण परिसरातील इंदिरा रसोईतील भाजीपाल्याच्या पुरवठा कराराशीही संबंधित असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब खानला राजस्थानच्या पोखरण येथून अटक केल्यानंतर दिल्लीला आणले. याठिकाणी त्याची चौकशी केली जात आहे. आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या हबीब खानची केंद्रीय यंत्रणांनीही चौकशी केली. हबीब खान यांच्या चौकशीच्या आधारे आयएसआयचे मोठे जाळे उघडकीस आणता येईल आणि ते उधळून लावण्यास मदत होईल, असे तपास यंत्रणांना वाटते.