पश्चिम बंगाल (West Bengal) शिक्षक भर्ती घोटाळाप्रकरणी (SSC Scam) ईडीची (ED) जबरदस्त कारवाई सुरू आहे. यातच ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जीने चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. तिच्या घरातून जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांचे आहेत, पार्थ यांचे लोकच हा पैसा आणून ठेवत. कधी-कधी पार्थ चटर्जी स्वतःही येत असत, असे अर्पिताने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपल्याला संबंधित रूममध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती, असा दावाही अर्पिताने केला आहे.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने म्हटले आहे, की जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जी यांचेच आहेत. त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी काल रात्रीपासून रडत आहे. ईडीच्या चौकशीनंतर ती कोलमडली आहे. ती रात्री उशिरा झोपली असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही, तर आपण निर्दोष असून यासंदर्भात आपल्याला काहीही माहीत नाही. आपल्याला त्या खोलीत जाण्याची परवानगीही नव्हती, असेही अर्पिताने म्हटले आहे.
टॉयलेटमध्ये खजिना... -शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पुन्हा एकदा कोलकात्यात्याच्या आसपास तीन ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांत ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील आणखी एका फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रुपये रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे, हे पैसे मोजण्यासाठी ईडीला तब्बल 10 तास लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा पैसा फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवण्यात आला होता.
गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ईडीने अर्पिताला 23 जुलै रोजीच अटक केली आहे.