परतवाडा (अमरावती) : ऑटोरिक्षाला धडक देणाऱ्या एसटी बसचालकास स्थानिक न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा बुधवारी सुनावली. अचलपूर तालुक्यातील कुष्टाला निघालेल्या परतवाडा आगाराच्या एमएच ४० एन ८०६५ क्रमांकाच्या एसटी बसने ३ मे २०१६ रोजी सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चमक गावातून फाट्यावर येणा-या एमएच २७ पी ६१६० क्रमांकाच्या ऑटोरिक्षाला टी-पॉइंटवर धडक दिली होती. सरमसपुरा पोलिसांनी ऑटोरिक्षाचालक रमेश महानकर यांच्या तक्रारीवरून आरोपी बसचालक संजय महादेव सोळंके (रा. सांगवा बाजार) विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस अधिकारी देवीदास खंडारे यांनी तपास पूर्ण करून अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी जखमी सुनीता नांदणे हिची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय पक्षाच्या युक्तिवादानंतर अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने बसचालकास तीन महिन्यांचा कारावास व २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने जखमी पीडित मुलीला यापैकी २००० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अतुल देशमुख यांनी सहकार्य केले.
अपघातप्रकरणी एसटी बसचालकास तीन महिन्यांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 6:06 PM