भंडारा : कोरोना संकटामुळे एसटीची आर्थिक स्थिती गंभीर झाली असून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही मिळत नाही. या प्रकाराने त्रस्त झालेल्या एसटी महामंडळाच्या भंडारा विभागातील नऊ कर्मचाऱ्यांनी चक्क विभाग नियंत्रकाविरूद्ध भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पोलिस गुन्हा नोंदवितात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पगारासाठी पोलिसात धाव घेण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्हा येतो. गत दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही. त्यामुळे कर्मचारी अडचणीत आले आहेत. वारंवार मागणी करूनही पगार मिळत नसल्याने भंडारा विभागातील नऊ कर्मचाऱ्यांनी बुधवारी भंडारा शहर ठाण्यात विभाग नियंत्रकाविरूद्ध तक्रार दिली. त्यात मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने दरमहा ७ तारखेला पगार देण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार पुर्वी सात तारखेला वेतन देण्यात येत होते. परंतु काही महिन्यापासून वेतन निश्चित तारखेला मिळत नाही. जुलै महिन्याचा पगार तर ऑगष्ट महिना संपत आला तरी मिळाला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला विभाग नियंत्रकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.
या तक्रारीवर विभागीय भंडारातील शिपाई सुरेश दहेकर, चालक सुरेश हलमारे, राजू बिसेन, महेंद्र टेंभरे, वाहक प्रशांत ढोबळे, जितेंद्र दलाल, नितीन मते, सहायक किरण रामटेके, स्वच्छक संतोषी राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे अधिकार विभागीय नियंत्रकांना नाही. पगाराचे सर्व अधिकार एसटी महामंडळाच्या मुंबई स्थित मध्यवर्ती कार्यालयाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकाविरूद्ध दिलेली तक्रार चुकीची आहे. -डॉ. चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.