उल्हासनगर : गावठी दारूच्या विक्री संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता कॅम्प नं-२ परिसरात घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरातील त्रिमूर्ती बालाजी मार्केट परिसरात गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान सचिन चव्हाण यांना मिळाली होती. सोमवारी सकाळी १० वाजता याबाबतची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या सचिन चव्हाण यांना विनोद कुकरेजा व अमित मिरचंदानी यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच डोक्याच्या मागच्या बाजूला लोखंडी रॉड मारून जखमी केले. जखमी झालेल्या चव्हाण यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याचा गुन्हा विनोद कुकरेजा व अमित मिरचंदानी यांच्या विरोधात दाखल करून अटक केली. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.