बुलढाणा : लोकसभा निवडणूक सुरू असल्याने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवण्यात येत आहेत. २३ एप्रिल राेजी पथकाने २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला तसेच आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर १ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०४ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच २०० वारस गुन्ह्यात २०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २२ वाहनांसह एकूण ३५ लाख ८३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य १३४०.४ लि., विदेशी मद्य १५०.५२ लि., बिअर ९१.०७, ताडी १४८ लि., (राउवा) २६ हजार ९१४ लि., हातभट्टी १ हजार ६७६ लि. पकडण्यात आले आहे.
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर यांनी २३ एप्रिल रोजी बोदवड-मलकापूर रोडवर बोदवड (जि. जळगाव) येथील एका गुन्ह्यांमध्ये एक स्विफ्ट चारचाकी वाहन यामध्ये एकूण देशी २५.९२ व विदेशी १७.३२ लि. असा एकूण २ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर शिंदे व जवान ए. पी. सुसरे यांनी केली.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिखली यांनी नशिराबाद फाट्याजवळ नाईक नगर, (ता. सिंदखेडराजा) येथे ०१ पिकअप बोलेरो या चारचाकी वाहन देशी दारू १९०.०८ व विदेशी दारू ८.६४ लि. मद्य पकडून एकूण ७ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा यांनी मौजे देऊळघाट येथे आरोपी अशोक सुखदेव पन्हाळे यांच्या राहत्या घरी देशी दारू २६४.९६ लि. मद्य पकडून एकूण १ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देऊळघाट येथे आरोपी गजानन दगडू पन्हाळे यांच्या राहत्या घरी देशी दारू ४३.२० लि. मद्य पकडून एकूण १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत.