पुणे : नोकरनामा देण्यासाठी दर महा ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आनंद दत्तात्रय काजळे (वय ३९) दुय्यम निरीक्षक आणि खासगी व्यक्ती गणेश राजेंद्र परीट (वय ३३, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तक्रारदार यांनी दुय्यम निरीक्षक आनंद काजळे यांच्याकडे नोकरनामा मिळवण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी काजळे याने त्यांच्याकडे चार महिन्यांचे २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सर्वप्रथम १४ ऑक्टोबर रोजी त्याची पडताळणी केली होती. त्यानंतर ३, ४, ६, ९ व १० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी त्यांनी तडजोड करुन ७ हजा रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरुन लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा आयोजित केला. तक्रारदाराकडून खासगी कारमध्ये बसून गणेश परीटमार्फत ७ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत: पैसे घेण्यास नव्हता तयारआनंद काजळे हा आपल्यावर कारवाई होऊ नये, म्हणून खूप काळजी घेत होता. प्रत्येक वेळी तक्रारदाराला बोलावून त्याच्याशी चर्चा करीत. त्यानंतर तुम्हाला कोणाकडे पैसे द्यायचे हे सांगतो, असे म्हणत होता. असे तब्बल ६ वेळा झाले. त्याचा नेहमीचा खासगी वाहनचालक बाहेर गेला असल्याने गेल्या २ दिवसापासून त्याने परीट याला चालक म्हणून बरोबर घेतले होते. काजळे कारमध्ये बसल्यावर तक्रारदार त्याच्याकडे पैसे देण्यास गेल्यावर त्याने ते चालकाकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने पैसे दिल्यावर लाचलुचपतच्या अधिकार्यांनी तातडीने चालकाला आम्ही एसीबीचे लोक आहोत, असे सांगितले. त्याबरोबर चालकाने गाडी थांबविली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात