जमीर काझीमुंबई - राज्यात बेरोजगाराचे प्रमाण वाढत असताना राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या तब्बल ४२ जणांनी भरती होण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवड होवूनही हजर न झालेल्या ४२ जण व एकाचा मृत्यू झाल्याने ४३ जणांच्या नियुक्ती राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी रद्द केल्या आहेत. एका भरतीमध्ये इतक्या पात्र उमेदवारांनी नकार दर्शविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धा परीक्षेतील वरिष्ठ पदांना प्राधान्य आणि नोकरीच्या अन्य संधीला प्राधान्य देत त्यांनी गुप्तवार्ता अधिकाऱ्याच्या नोकरीवर पाणी सोडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मुंबईतील २६/११ च्या हल्यानंतर पोलिसांच्या सक्षमीकरणातर्गंत सुरक्षा व्यवस्था व सामु्रगीमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत.त्यातर्गंत राज्यातील गुन्हेगारीबरोबरच राजकीय, सामाजिक, सहकारी घडामोडी, संघटनात्मक हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभाग सक्षम करण्यासाठी त्यांना सहायक गुप्त वार्ता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारी गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या ११ वर्षात तीन वेळा या पदाची भरती घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये २०१८मध्ये सहायक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर परीक्षा व मुलाखतीनंतर गेल्यावर्षी राज्य गुप्तवार्ता विभागात २०३ उमेदवारांची सहाय्यक अधिकारी म्हणून अंतिम यादी जाहीर करण्यात आली. तर १०६ जणांची प्रतिक्षा यादी निश्चित केली होती.
निवड झालेल्यांना प्रशिक्षणासाठी तातडीने हजर होण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र निवड झालेल्या उमेदवारांतील कपिल बोटे याचे दरम्यानच्या काळात निधन झाले. तर ४२ जणांना वारंवार सूचना करुनही हजर झाले नाहीत. त्यांनी त्यांनी सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी म्हणून रुजू होण्यास नकार दर्शविला. त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांनी काढले. त्यांच्या पदावर प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता व प्राधान्य क्रमांकाप्रमाणे निवड करण्यात आली आहे. ४२ उमेदवारातील बहुतांश जण हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत. त्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या वरिष्ठ पदासाठी प्रयत्न करीत असून त्यामध्ये यशस्वी होण्याची खात्री असल्याने त्यांनी सहाय्यक अधिकारी म्हणून हजर होण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांच्या नकाराचा लाभ प्रतिक्षा यादीतील गुणवंत व गरजू उमेदवारांना मिळाला आहे.१७ तरुणींचा नियुक्तीला नकारसहाय्यक गुप्तवार्ता अधिकाऱ्यांच्या निवडीतील सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतरही ४२ जणांनी या पदावर हजर होण्यास नकार दर्शविला आहे. त्यामध्ये तब्बल १७ तरुणींचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षेतून उच्च दर्जाच्या पद मिळविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
आरक्षणानुसार या पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५ महिला उमेदवारासाठी जागा राखीव होत्या. मात्र निवड झालेल्या ५ पैकी एका तरुणीची उंची कमी असल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले होते.तिने त्यावर ‘मॅट’मध्ये आव्हान दिल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र गेल्यावर्षी १४ जूनला मॅटच्या औरंगाबाद खंडपीठाने तिचा दावा फेटाळून लावल्याने त्या रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील अन्य तरुणीची निवड करण्यात आली आहे.