मुंबई - नुकतेच शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. त्यानंतर आता बाबरी मशिदीसंबंधीचे वक्तव्य करणं प्रज्ञासिंग यांना भोवलं आहे. निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे माझे कायदेविषयक प्रकरण असून माझे वकील त्याबाबत पाहत आहे अशी माहिती एएनआयला दिली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळमधील भाजपाच्या उमेदवार आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अयोध्येमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी मी देखील त्यात सहभागी होते. मला त्याचा अभिमान आहे असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग यांनी केले होते. बाबरी मशीद पाडताना मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला ही संधी दिली त्याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जाईल हे आम्ही नक्की निश्चित करु असे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर मुलाखतीदरम्यान म्हणाल्या होत्या. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना नोटीस बजावण्यात आली. तरी देखील साध्वी प्रज्ञासिंह मी तिथे गेले होते यावर ठाम होत्या. तसेच मी ही गोष्ट नाकारणार नाही. मी अयोध्येला जाऊन राम मंदिर बांधण्यासाठी मदत करणार आहे. कोणीही मला त्यापासून थांबवू शकत नाही असे साध्वी प्रज्ञासिंग म्हणाल्या. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शहीद हेमंत करकरेंबद्दलच्या विधानावर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागितली. ते माझे व्यक्तीगत दु:ख होते असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.
BJP Bhopal candidate