ठाणे : मौजमजेसाठी विविध मंदिरांत चोरी करणाऱ्या चोराला चोरी करतानाच ठाणे पूर्व येथे नागरिकांच्या सहकार्याने कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरात चोरी करण्यापूर्वी संपूर्ण मंदिराची रेकी ओम सातपुते करत असे. त्याच्याजवळ चाव्यांचा जुडगा असून, मास्टर चावीला तेल लावून दानपेटीचं कुलूप तो उघडत असल्याचे तपासात पुढे आले आहे. स्वत:च्या चैनीसाठी अनेक मंदिरांत चोऱ्या केल्याचेही समोर आले आहे. चौकशीत त्याने यापूर्वी ठाणे, कल्याण, डोंबिवली, माणगाव, नाशिक पुणे शहरात मंदिरात चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
ठाणे पूर्व साईनाथ नगरातील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरट्याने दिवसाढवळ्या मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरीची पूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेज चित्रित झाली आणि चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसून आला. पोलिस या चोरट्याचा मागावर होते. दरम्यान, मंदिरातील दानपेटीतील रक्कम सुलभपणे चोरी करता येत असल्याने, ओम सातपुते (वय ३८) ठाणे पूर्व आदर्शनगर सत्पशृंगी मंदिरात चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. संशयितरीत्या त्याच्या हालचाली बघून नागरिकांनी त्याला हटकले, यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला ओळखून ताब्यात घेतले. कोपरी पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यावर ओम याने हनुमान मंदिरातील चोरीची कबुली दिली, अशी माहिती कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी दिली. चोरीचे गुन्हे करताना, तो एकटा आहे की, अजून त्याचे साथीदार आहेत, याचा शोध कोपरी पोलिस घेत आहेत.
नवी मुंबईतील घणसोली येथील हनुमानाच्या मंदिरातील दानपेटी चोरल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरटे दानपेटी चोरून घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. त्याद्वारे रबाळे पोलिस अधिक तपास करत आहेत. घणसोली घरोंदा येथील हनुमानाच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. मंदिरालगत असलेल्या मैदानात सकाळी काहीजण गेले असता त्यांना दानपेटी आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिस आणि संबंधितांना माहिती दिली. यावेळी दानपेटीची चोरी झाल्याचे उघड झाले. यामुळे परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी चोरून ती फोडून त्यामधील रक्कम नेल्याचे उघड झाले. मात्र, चिल्लरला हात लावला नाही. रहिवासी सोसायटीत हे मंदिर असून, एका संस्थेमार्फत ते हाताळले जात आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली, त्या मैदानात रात्रीच्या वेळी गर्दुल्यांचा वावर असतो. यापूर्वी तिथे टोळक्यांमध्ये हाणामारीच्यादेखील घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नागरिकांकडून संशय व्यक्त होत आहे.