उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यापेक्षा या महिलेच्या आईची काहीही झाले तरी गप्प बसविण्याची वृत्ती त्यापेक्षाही धक्कादायक आहे. घटना १९८६ मधील असली तरी आता ती उजेडात आली आहे, तसेच कारवाई देखील सुरु झाली आहे.
पीडितेचे वय अडीच वर्षांचे असताना तिच्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर तिच्या विधवा आईने अलीगढच्या एका व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला. पीडिता जेव्हा ७ वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर मधल्या सावत्र काकाने बलात्कार केला. तिच्या पोटात दुखू लागले होते. यावर तिच्या आईने तिला गोळी देऊन गप्प राहण्यास सांगितले. यानंतर काही वर्षांनी सर्वात छोट्या सावत्र काका सत्येंद्रने ती ११ वर्षांची असताना बलात्कार केला. यानंतर त्याच्याकडून तिचे लैंगिक शोषण लग्न होईपर्यंत सुरुच होते. तिने विरोध केला तर तिला धमक्या दिल्या जात होत्या.
लग्न झाल्यानंतर तिची या सर्वांपासून सुटका झाली. २०११ मध्ये तिचे अलीगढच्याच एका लष्करातील जवानासोबत लग्न झाले. या पीडितेला दोन मुले आहेत. सैन्यातून निवृत्त झाल्यावर तिच्या पतीने अलीगढमध्येच व्यवसाय सुरु केला. आता तो घरीच असल्याने त्याने तिला अनेकदा सासरी जाऊन येऊ असे सांगितले. परंतू, ती त्याला नकारच देत होती. २०१९ मध्ये ती पती लष्करात सेवा देत असताना सावत्र भावासोबत माहेरी गेली होती, तेव्हा देखील तिची अब्रू लुटण्याचा प्रकार घडला होता.
तिने त्यावेळीदेखील विरोध केला होता. परंतू, तिच्या हपापलेल्या सावत्र काकांनी तिला मारहाण केली आणि तिचे वैवाहिक आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या पतीला खोट्या केसमध्ये अडकवून तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली. पतीला काहीतरी शंका आली म्हणून त्याने तिला विश्वासात घेऊन माहेरी न जाण्याचे कारण विचारले. तिने सातव्या वर्षापासून घडत असलेला प्रकार पतीला सांगून टाकला. लष्कराच्या शिस्तीत असलेल्या पतीने पत्नीला साथ द्यायचे ठरविले.
पत्नीला न्याय मिळवून द्यायचाच, तसेच तिच्या हपापलेल्या काकांनाही धडा शिकवायचा या उद्देशाने त्याने प्रयत्न सुरु केले. पतीच्या मदतीने पीडितेने IGRS पोर्टलवरून सर्व अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर अलीगड पोलिसांनी आता पीडितेच्या तक्रारीवरून बन्नादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केल्याचे म्हटले आहे.