कल्याण: कोरोना काळात दिड वर्षापासून प्रिन्टींग प्रेस बंद असल्याने ओढावलेल्या आर्थिक टंचाईने नैराश्यात सापडलेल्या एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत रविवारी मध्यरात्री घडली. बंडू पांडे असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये राहणा-या बंडू पांडे यांचा उल्हासनगरच्या कॅम्प 3 येथे ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिन्टींग प्रेसचा व्यवसाय सुरू होता. कोरोनाच्या महामारीत लागू झालेल्या लॉकडाऊन आणि र्निबधामध्ये गेल्या 17 ते 18 महिन्यांपासून त्यांचा प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय पूर्णत: ठप्प पडला होता. व्यवसाय डबघाईला आल्याने पांडे आर्थिक संकटात सापडले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी प्रिन्टींग प्रेसचे साहीत्य विकण्यास सुरूवात केली होती. यात प्रिन्टींगची महागडी मशीन देखील त्यांनी माफक दरात विकली होती. आर्थिक टंचाईमुळे पांडे मनाने खचले होते. यात आलेल्या नैराश्येत त्यांनी रविवारी मध्यरात्री रहात्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुस-या खोलीत होत्या. आत्महत्येपूर्वी पांडे यांनी चिठ्ठी लिहीली असून त्यांच्या आत्महत्येप्रकरणी कोणाला जबाबदार धरु नये असे यात नमूद केले आहे. दरम्यान या घटनेची कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याचा तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय गोडे हे करीत आहेत.