जमीर काझीमुंबई : प्रत्येक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले राज्य पोलीस दलातील सव्वा दोन लाखावर खाकी वर्दीवाले ‘कोरोना’च्या पादुर्भावाला लगाम घालण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूचा संसर्ग त्यांनाही जडण्याचा धोका असल्याने प्रत्येक पोलीस ठाणे व विविध शाखामध्ये कार्यरत असलेल्यापैकी ५० टक्के अधिकारी, अंमलदारांची ड्युटी लावण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत, मात्र त्यांच्या या आदेशाकडे पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी अद्यापही डोळेझाक केली आहे.
सर्वच पोलिसांना कामावर पाचारण करण्यात येत आहे.नेहमीप्रमाणे त्यांना ड्युटी लावण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांमध्ये संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयासह जिल्ह्याच्या ठिकाणी काहीचा अपवाद वगळता बहुतेक वरिष्ठ अधिकारी घरी बसून किंवा कार्यालयातून सूचना देत आहेत. मात्र निरीक्षक व त्याखालचे अधिकारी आणि अंमलदारांना रोज पोलीस ठाणे व रस्त्यावर बंदोबस्ताची ड्युटीला सामोरे जावे लागत आहे. खात्यातील शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांना वरिष्ठांच्या मनमानीबद्दल उघडपणे बोलता येत नसल्याने तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.राज्यासह पुर्ण जगाला कोरोनाच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशात कोरोनाची सर्वाधिक लागण असलेल्या रुग्णांची संख्यामहाराष्ट्रात असून ती दिवसेंदिवस वाढत राहिली आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोरोनाग्रस्ताच्या सानिध्यात असलेल्यांनाही त्याची लागण होत असल्याने ही संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व सरकारी, खासगी अस्थापनाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी ठेवून उर्वरिताना सुट्टी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कालावधीत सर्व पोलीसही नागरिकांच्या मदतीला जुंपले असून सार्वजनिक वाहतुक कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना या विषाणूचा पादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने सर्व घटक प्रमुखांनी आपापल्या शाखा, ठाण्यातील पोलिसांची हजेरी ५० टक्के लावावी, एकदिवसाआड त्यांना आलटून पालटून ड्युट्या देण्यात याव्यात, पोलिसांना या आजाराची लागण होवू नये, यासाठी विशेष खबरदारी बाळगण्याचे आदेश १९ मार्चला पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्याकडून बजाविण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी तातडीने करावयाची असताना बहुतेक घटकप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सहाय्यक आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी घरी किंवा कार्यालयात बसून कनिष्ठ अधिकाऱ्यांना फर्मान सोडत आहेत.
Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार
काय आहेत महासंचालकांचे आदेश ?पोलीस महासंचालकांनी गुरूवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व विभाग, शाखा व पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांची हजेरी ५० टक्केवर आणावी, अतिमहत्वाचे व तातडीचे कामासाठी तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवरील गर्दी कमी करण्याचे काम त्यांना देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांना रोज कार्यालयात न बोलाविता आळीपाळीने ड्युटी लावाव्यात, प्रत्येक शाखेत दोन टीम तयार ठेवून त्यापद्धतीने आखणी करण्यात यावी,
अधिकारी, अंमलदारांना कोरोनाचा संसर्ग होवू नये,यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेवून ड्युटीचे नियोजन करावे, पोलिसांना रोज सलगपणे ड्युटी देवू नये, त्यांच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात यावी - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक)