विशाल सोनटक्के, यवतमाळ: केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीतील जादा पैसे आकारणाऱ्या सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात आहे. १७ जानेवारी रोजी तहसिल कार्यालय झरीजामणी येथे या पथकाने भेटे दिली असता सेतु सुविधा केंद्र चालक यांच्या कडून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, उत्पन्नाचा दाखला, एपत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का पेक्षा जास्त पैसे घेत असल्याबाबत नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर येथील पथकाने शनिवारी सकाळी सेतू केंद्रांची गुप्तपणे पाहणी सुरू केली. तसेच व्हीडीओ काढण्यात आलेला असून त्यामध्ये भोयर सेतु सेवा केंद्र, तहसिल कार्यालय चौक, झरीजामणी व ओम साई सेतु सेवा केंद्र, बिरसा मुंडा चौक, झरीजामणी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे सेतु केंद्रावर कारवाई सुरू आहे.
नागरिकांनी या सेतु केंद्रात कोणत्याही दाखल्यासाठी अर्ज करू नये, तसेच इतर कोणतेही सेतु केंद्र चालक शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात पुराव्यानिशी तक्रार करावी, असे आवाहन केळापूरच्या उपविभागीय अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.