सोशल मीडियावर रोज धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामधून समोर आली आहे, ज्यामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी कार चोरली. ही घटना ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क परिसरात घडली.
श्रेय, अनिकेत नागर आणि दीपांशु भाटी हे तीन विद्यार्थी ग्रेटर नोएडा येथील एका महाविद्यालयात शिकतात. गर्लफ्रेंडला बाहेर नेण्यासाठी त्यांनी कार चोरण्याचा कट रचला. २६ सप्टेंबर २०२४ रोजी दोन विद्यार्थ्यांनी ग्रेटर नोएडा येथील कार शोरूममधून ह्युंदाई व्हेन्यूची टेस्ट ड्राइव्ह घेतली. आपली ओळख लपवता यावी म्हणून ते हेल्मेट घालून शोरूममध्ये पोहोचले.
शोरूमच्या कर्मचाऱ्याने कार पार्किंगमधून बाहेर काढली आणि दोन्ही विद्यार्थ्यांना कारमध्ये बसण्यास सांगितलं. एक विद्यार्थी ड्रायव्हरच्या सीटवर तर दुसरा मागे बसला. कार शोरूममधून बाहेर येताच त्यांनी कर्मचाऱ्याला कारमधून ढकलून दिलं आणि कार घेऊन पळ काढला.
शोरूम मालकाने या घटनेनंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि मॅन्युअल इंटेलिजन्सचाही वापर केला. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आणि त्यानंतर तीन विद्यार्थ्यांना अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्यांनी सांगितलं की, त्यांनी ही कार त्यांच्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी चोरली होती. तिला खूश करायचं होतं, त्यामुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं. या तीनही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारही जप्त केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.